'' झाड''

शुष्क वठलेले बिचारे झाड मी
बहरल्या रानामधे ओसाड मी

दु:ख दुनियेला कसे समजायचे
लपविलेले पापण्यांच्या आड मी

सांग दहशतवाद संपावा कसा?
वृत्त वाचुन हळहळे तो भ्याड मी

आवरत आहे गुपित ओठांवरी
लोक म्हणती सभ्य .....आहे द्वाड मी

ना कुणी आंजारले,गोंजारले
पुरवितो हल्ली स्वतःचे लाड मी

आज तोंडातून बरसाव्या शिव्या
का? कितिंदा बाळगावी चाड मी

कचकड्याच्या मोहमय दुनियेमधे
टाकतो माझ्या मनावर धाड मी

रक्त सळसळते पुन्हा थंडावते
भावना शाबूत पण मुर्दाड मी

दाखवू आश्चर्य अजुनी केवढे
लाखदा उडलोय की तिनताड मी

काव्य ''कचरा'' मानते दुनिया तिथे
खपविण्या आलो गझलचे बाड मी

मी न गालिब्,भट्,इलाही,रणपिसे
मित्र हो ''कैलास गायकवाड'' मी

--डॉ.कैलास गायकवाड